Saturday 30 January 2016

पावसाच्या सरी..


पावसाच्या सरी तशा येती हाका
कसे येऊ नका म्हणायचे..?

पानांचे तोरण


पानांचे तोरण पानांची रांगोळी
घळ सजलेली केंव्हाचीच..!

निर्गुणास वाटे


निर्गुणास वाटे ल्यावे रूप-गूण
फुटे पानातून ब्रह्मकळी..!

प्रतिबिंबामध्ये..


प्रतिबिंबामध्ये फक्त बिंबाकृती
नाद गंध गती स्व-रूपात..!

आज आशा आहे..


आज आशा आहे येईल पाऊस
होईल उरूस सृजनाचा..!

Friday 29 January 2016

देखणे आकाश


देखणे आकाश भरारी देखणी
वेरूळची लेणी आठवली..!

Thursday 28 January 2016

तरंग-लावण्य..


तरंग-लावण्य बाहतेय पण
मुळांचे पैंजण रोखतात..!

गतीला रोखण्या..


गतीला रोखण्या नाही कुणी वाली
आपणच झाली लाल दिवा..!

Wednesday 27 January 2016

रंग रूप गंध...


रंग रूप गंध टच्च भरलेत
उत्कंठा देठात फुलण्याची..!

Monday 25 January 2016

तमाचे साम्राज्य..


तमाचे साम्राज्य सृष्टीला व्यापून
प्रकाशाची खूण चंद्रापाशी..!

Tuesday 19 January 2016

कोणाचे नेपथ्य..


कोणाचे नेपथ्य कोण करविता
रंगमंच रिता टाळ्या घेई..!

असीमाला सीमा


असीमाला सीमा मान्य नाही त्याला
ओलांडून गेला क्षणार्धात..!

Monday 18 January 2016

तुरा नि पिसारा


तुरा नि पिसारा सारे सजलेत
साळुंकी तंद्रीत विसावली..!

Sunday 17 January 2016

ईशावास्य सारे..


ईशावास्य सारे हे जे आहे ते ते
रोज प्रकटते मावळून..!

सानुलेसे रोप..


सानुलेसे रोप खेळ निरखत
निश्चिंत कवेत विराटाच्या..!

खोल गर्भातला


खोल गर्भातला ओलेता अंधार
हिरवा गंधार आळवतो..!

केशरी उजेड..


केशरी उजेड पाणीही केशरी
प्रतिबिंबाघरी आले बिंब..!

Wednesday 13 January 2016

छोटे छिद्र होते


छोटे छिद्र होते आता हे विवर
शून्याचा आकार मोठा फक्त..!

Tuesday 12 January 2016

झाडाच्या सवेच


झाडाच्या सवेच नृत्य उगवते
आकारास येते काष्ठशिल्प..!

Monday 11 January 2016

निसर्गाची भाषा..


निसर्गाची भाषा मूक प्रत्ययांची
डौलदार तिची चित्रलिपी..!

Sunday 10 January 2016

अलगद असे..


अलगद असे झेलले फुलाला
जसे की बाळाला खेळवावे..!

Saturday 9 January 2016

असण्याचे भान..


असण्याचे भान विणते तोरण
करते अर्पण ज्याचे त्याला..!

Friday 8 January 2016

कुंडी प्रसवली..


कुंडी प्रसवली जन्मले उद्यान
चौकटींचे भान साहवेना..!

Thursday 7 January 2016

काही न सांगता..


काही न सांगता कुठूनसे आले
व्दारपाल झाले क्षणभर..!

Wednesday 6 January 2016

भूत भविष्याचा..


भूत भविष्याचा नाही ऐल-पैल
अथांग केवळ वर्तमान..!

Tuesday 5 January 2016

पंख हवे दोन..


पंख हवे दोन नकोत पायर्‍या
भरारी घ्यावया आकाशात..!



Monday 4 January 2016

वेगळ्या स्वरात..


वेगळ्या स्वरात गाणी कशी गावी
कशी बदलावी पार्श्वभूमी..?

Sunday 3 January 2016

सांगतच राही..


सांगतच राही निसर्ग रंगून
घ्यायचे टिपून किती काय..?

Saturday 2 January 2016

कापून टाकती..


कापून टाकती त्यांना हवे तसे
मुळांना हवेसे येते वर..!

मुक्त गातो आहे..


मुक्त गातो आहे निसर्गाचा भाट
दिवाळी पहाट आषाढात..!

Friday 1 January 2016

एकलेच बिंब


एकलेच बिंब बघे भोवताली
प्रतिबिंब खाली वाट पाहे..!

तरंग वरती..


तरंग वरती खोलात काहूर
सुटतोच धीर पाण्याचाही..!