Thursday, 31 December 2015

वर बहरते..


वर बहरते मुळांची तहान
घेते बीजातून रंग-रूप..!

Wednesday, 30 December 2015

गळण्याचा क्षण..


गळण्याचा क्षण जरा थोपवून
घेतोय भोगून इहलोक..!



Tuesday, 22 December 2015

चिंब ढगातून..


चिंब ढगातून जरा डोकावला
थेट खाली आला पृथ्वीवर..!

Monday, 21 December 2015

कितीतरी दृश्ये..


कितीतरी दृश्ये रीतीच राहिली
पाखरे न आली चौकटीत..!

Sunday, 20 December 2015

आकाशात मुक्त..


आकाशात मुक्त खेळतात पक्षी
रेखतात नक्षी नित्य नवी..!



Friday, 18 December 2015

जाता जाता रात्र..


जाता जाता रात्र अशी गोंधळली
चंद्र विसरली झाडावर..!

Thursday, 17 December 2015

झाडे आनंदली..


झाडे आनंदली पाऊस झेलून
देठातली धून मोर झाली..!

Wednesday, 16 December 2015

किती युगांचा हा..


किती युगांचा हा संचिताचा शीण
बुंध्यावर वीण वेदनांची..!

Tuesday, 15 December 2015

गार्‍हाणी घेऊन..


गार्‍हाणी घेऊन आकाशी निघाला
साद पावसाला घालावया..!

Monday, 14 December 2015

आकाश अंगण..


आकाश अंगण झाडाची रांगोळी
चंद्रकोर कळी मधोमध..!



Sunday, 13 December 2015

बंद सार्‍या वाटा..


बंद सार्‍या वाटा जमीन म्हातारी
आर्त टाहो तरी फुटलाच..!

Wednesday, 9 December 2015

नव्यांसाठी खाली..


नव्यांसाठी खाली उतरून आली
निर्मम ती झाली प्राणांतून..!

Tuesday, 8 December 2015

अदृश्य झाला तो..


अदृश्य झाला तो दृश्यातून जरी  
स्मरणांच्या तीरी झेपावतो..!

Monday, 7 December 2015

उमलण्या आधी..


उमलण्या आधी सुकल्यानंतर
दिसते सुंदर नसणेही..!



Sunday, 6 December 2015

आसवांसोबत..


आसवांसोबत नेत्रही गळाले
अश्रू मग झाले डोळे दोन..!

Saturday, 5 December 2015

गळालेली फुले..


गळालेली फुले होऊनिया खत
पुन्हा फुलतात वृक्षावर..!



Friday, 4 December 2015

तहानली चोच..


तहानली चोच व्याकुळ इकडे
थेंबुटा तिकडे कासावीस..!

Thursday, 3 December 2015

कोणते काहूर..


कोणते काहूर आत रुजलेले
दुःख उगवले डोळ्यातून..!

Wednesday, 2 December 2015

हिरव्या गर्दीत..


हिरव्या गर्दीत एकटे पडले
कुशीत घेतले माऊलीने..!


Tuesday, 1 December 2015

ओवलेले मोती..


ओवलेले मोती तसे न हे पक्षी
क्षणात ही नक्षी उडणार..!

Monday, 30 November 2015

पक्षी आडोशाला..


पक्षी आडोशाला दृश्य दिसेनासे
पाऊस उसासे धुवांधार..!


Sunday, 29 November 2015

कोणतीही फट..


कोणतीही फट उगवाया पुरे
आकांताचे झरे आत जर..!

Saturday, 28 November 2015

तोर्‍यात उभा हा..


तोर्‍यात उभा हा इवलासा तुरा
करतो मुजरा आकाशाला..!

Friday, 27 November 2015

ओघळले नेत्र..


ओघळले नेत्र पाना-फुलांचेही
पर्जन्याची ग्वाही मिळताच..!





Thursday, 26 November 2015

वेगळाच स्नेह..


वेगळाच स्नेह झाडांशी वेलींचा
हार अस्तित्वाचा समर्पिती..!

Wednesday, 25 November 2015

अप्राप्य आकाश..


अप्राप्य आकाश रस्त्यावर आले
किती दीन केले त्याला आम्ही..!

Monday, 23 November 2015

बाळवडालाही..


बाळवडालाही सोडले न त्यांनी
विद्रोह पानांनी केला तरी..!

Sunday, 22 November 2015

कसा मी कोरडा..


कसा मी कोरडा राहिलो अजून
पाण्यात असून कैक युगे..!

Saturday, 21 November 2015

चित्र-विचित्रांचा..


चित्र-विचित्रांचा खेळ जागोजाग
निसर्गाची बाग अनुपम्य..!

Friday, 20 November 2015

कशाकशाचा हा..


कशाकशाचा हा विळखा पडला
आता सुटकेला वाव नाही..!

Thursday, 19 November 2015

धरणीचा भार


धरणीचा भार । करावया कमी
बुंधा होई भूमी । आपसुखे..!



Wednesday, 18 November 2015

पाण्याचीच नाव..


पाण्याचीच नाव पाण्याचीच वल्ही
डौलात निघाली पाण्यासवे..!

Tuesday, 17 November 2015

एकत्र नांदती


एकत्र नांदती भक्ष्य नि भक्षक
निसर्ग रक्षक दोघांचाही..!



कैलाशपती की..


कैलाशपती की वधू सजलेली
लाल वेषातली वृक्षकन्या?



Monday, 16 November 2015

सोडावा की नको..


सोडावा की नको एकांताचा डोह
बाहेरचा मोह भिववितो..!

Sunday, 15 November 2015

नजर न लागो


नजर न लागो । ध्यानस्थ सुखाला
शब्द थबकला । नजरेत..!

Saturday, 26 September 2015

तळ्याकाठी तळे


तळ्याकाठी तळे  तिचे एकटीचे
तिच्या तरंगांचे  राज्य तिथे..!

Friday, 25 September 2015

नवी नृत्यमुद्रा


नवी नृत्यमुद्रा प्रश्नांचा गुंताळा
की शुद्ध कंटाळा असण्याचा..!

Tuesday, 22 September 2015

तुलाही सुंदरा



तुलाही सुंदरा तगादा भुकेचा
विसर नभाचा पाडणारा..!

Monday, 21 September 2015

केशरी आसक्ती


केशरी आसक्ती  अशी ओलीचिंब
प्रत्ययाचे बिंब  काळजात.. !